पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सध्याच्या धावपळीच्या युगात भौतिक सुखांची जुळवाजुळव करताना मानवी जीवन अस्थिर आणि तणावपूर्ण होत चालले आहे. आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देताना आपण त्यांना नैतिक मूल्ये आणि सुसंस्कारांचे धडे देण्यात काहीसे मागे पडत आहोत की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आपला धर्म, संस्कृती, परंपरा आणि संतांची शिकवण आजच्या पिढीपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज बनली असून, याच उद्देशाने महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य तापोळा येथील श्री पद्मावती मंदिरात भव्य ‘बाल सुसंस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या शिबिरातून मुलांच्या मनावर संस्कारांची शिदोरी कोरली जाणार आहे.
या शिबिरासाठी वारकरी संप्रदायातील दिग्गज गुरूवर्य शांतीब्रह्म मारूतीबाबा कुरेकर, संतवीर बंडातात्या कराडकर, डॉ. नारायणबाबा जाधव, स्वामी चित्तप्रकाशानंद सरस्वती यांच्यासह जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अनेक मान्यवरांचे शुभाशिर्वाद लाभले आहेत. युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रदिप महाराज संकपाळ (लाखवड) यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरामध्ये इयत्ता ३ री ते ११ वी मधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शिबिरार्थींना या १५ दिवसांच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर टाळ-मृदंग वादन, भजन, गीता पठण, हरिपाठ आणि थोर संतांच्या तसेच शूरवीरांच्या चरित्रांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानांतून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासावर भर दिला जाईल.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची चोख व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली असून शिबिराची शिस्त पाळण्यासाठी मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२६ पर्यंत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून मर्यादित प्रवेश संख्या असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात अनेक नामांकित ह.भ.प. मंडळींचे मार्गदर्शन लाभणार असून, जे भाविक या कार्यात अन्नदानासाठी इच्छुक आहेत त्यांनी ह.भ.प. विठ्ठल महाराज संकपाळ किंवा ह.भ.प. यश महाराज संकपाळ यांच्याशी संपर्क साधून आपले योगदान द्यावे. आपल्या मुलांचे जीवन आदर्श आणि सुसंस्कृत घडावे यासाठी हे शिबीर एक सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
-
या पवित्र कार्यात सहभागी होऊन अन्नदानाची सेवा करू इच्छिणाऱ्या भाविकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ह.भ.प. विठ्ठल महाराज संकपाळ (९४०४७९९०५८) किंवा ह.भ.प. यश महाराज संकपाळ (७०३८६९०४६३) यांच्याशी संपर्क साधता येईल.

निसर्गरम्य तापोळा परिसरात भक्ती आणि संस्कारांच्या या संगमात आपल्या पाल्यांना सहभागी करून त्यांचे जीवन आदर्श घडवावे, असे आवाहन युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रदिप महाराज संकपाळ यांनी केले आहे.
























