पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कला क्रीडा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः महिलांसाठी आयोजित केलेला ‘होम मिनिस्टर’ (खेळ पैठणीचा) कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यानंतर राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.
शिवजयंतीनिमित्त गावातील महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. उखाणे, पारंपरिक खेळ आणि विविध स्पर्धांमुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली. दैनंदिन कामातून विरंगुळा आणि एकीची भावना वाढीस लावणारा हा उपक्रम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करून गेला. या स्पर्धेत विजेत्या ठरल्या त्या संगीता संजय मालुसरे यातील इतर विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
’शिवजयंती उत्सवातून समाजहित’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. याच बरोबर आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ७० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी पाळीव प्राण्यांच्या आरोग्य तपासणीचाही आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष योगेश मालुसरे, दीपक मालुसरे, तेजस मालुसरे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ मिरवणुका न काढता अशा सामाजिक उपक्रमांतून शिवजयंती साजरी केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून या मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.
























