पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ‘तुमच्या घराचा कोपरा आमच्या हद्दीत येतो’ असा दावा करत, विरोधकांनी मजुरांच्या मदतीने चक्क भिंत पाडून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शांताराम दगडू जंगम (वय ६८, रा. पाचगणी) आणि विरोधक भारती राजेंद्र आंब्राळे, ओंकार राजेंद्र आंब्राळे व अभिषेक राजेंद्र आंब्राळे हे शेजारी-शेजारी राहतात. जंगम कुटुंबाचा ‘डंक’ असलेली खोली ही १९९० सालापासून त्यांच्या ताब्यात आहे. मात्र, या खोलीचा काही भाग आमच्या जागेत येत असल्याचा दावा विरोधक गेल्या काही दिवसांपासून करत होते.
दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास, विरोधकांनी आपसात संगनमत करून मजूर आणि कामगारांच्या सहाय्याने डंक असलेल्या खोलीवर कारवाई सुरू केली. शांताराम जंगम यांनी ‘ही खोली जुनी आहे, ती तुम्ही पाडू शकत नाही’ अशी विनंती केली असता, विरोधकांनी त्यांना जुमानले नाही. उलट, मजुरांच्या मदतीने डंकाच्या खोलीच्या तिन्ही बाजूंच्या भिंती पाडून त्याचे अतोनात नुकसान केले.
- घटना घडताना जेव्हा शांताराम जंगम आणि साक्षीदार विकास जंगम यांनी विरोधकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि दमदाटी करून तिथून हाकलून देण्यात आले.

या घटनेनंतर पीडित शांताराम जंगम यांनी तातडीने पाचगणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध BNS ३२४(४), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये अदखलपात्र अहवाल क्रमांक ८८/२०२६ नुसार नोंद केली आहे. या प्रकरणाची पुढील कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान मुलाणी करत असून, फिर्यादींना योग्य त्या न्यायालयातून दाद मागण्याची समज देण्यात आली आहे.
























