पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जावली तालुक्याला बसला असून, बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ओझरे (ता. जावली) येथे वळीव पाऊस आणि चक्रीवादळासारख्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून अंगावर पडल्याने श्रीमती शांताबाई बाबुराव लकडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण ओझरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली. यावेळी शांताबाई लकडे या ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूला असलेल्या आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होत्या. सायंकाळी ५:३० च्या सुमारास वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्याने रौद्र रूप धारण केले.
या वादळी वाऱ्याचा दाब शाळेच्या इमारतीत शिरल्याने, गतवर्षी शाळेच्या टेरेसवर बांधण्यात आलेली संरक्षक भिंत या वाऱ्याचा वेग सोसू शकली नाही. काही क्षणातच ही भिंत कोसळली. दुर्दैवाने, भिंतीच्या विटा थेट शेतात काम करणाऱ्या शांताबाईंच्या डोक्यावर पडल्या. वार इतका भीषण होता की, त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्याच शेतात काम करत असताना अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने लकडे कुटुंबासह संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
वळवाच्या या तांडवाचा फटका केवळ ओझरे गावालाच नाही, तर परिसरातील वाहतुकीलाही बसला. मेढा-सातारा रस्त्यावरील वेण्णानगर येथे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाकडून तातडीने झाड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले, मात्र या पावसामुळे झालेल्या वित्त आणि जीवितहानीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
























