पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा (प्रतिनिधी): महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात भरदिवसा झालेल्या एका धाडसी घरफोडीच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली असून, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील स्वर्गीय राघू जानू कदम यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे १.५ तोळे सोन्याचे दागिने आणि २५ ते ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही चोरी करून चोरटे दुचाकीवरून पसार होत असताना काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांना पाहिले. निळ्या आणि काळ्या रंगाचे शर्ट घातलेले हे दोन संशयित तोंडाला मास्क लावून वेगाने दुचाकीवरून निघून गेले.
विशेष म्हणजे, ज्या घरात ही चोरी झाली, तेच घर काही दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यामुळे चर्चेत आले होते. निसर्गाच्या कोपापाठोपाठ आता चोरट्यांनीही याच कुटुंबाला लक्ष्य केल्याने स्थानिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. चोरीची घटना उघडकीस येताच अवघ्या ३० मिनिटांत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत संशयितांचा शोध सुरू केला असून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांच्या वर्णनावरून त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. महाबळेश्वरच्या दुर्गम ग्रामीण भागात दिवसाढवळ्या होणाऱ्या अशा चोरीच्या प्रकारांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ कळवा किंवा पोलिसांच्या ताब्यात द्या’, असे आवाहन ग्रामस्थांकडून केले जात असून आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी जोर धरत आहे.
























