पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : जावळी तालुक्यातील महू गावचे सुपुत्र आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. या नामांकित संस्थेचे उप महाव्यवस्थापक रवींद्र मारुती रांजणे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशपातळीवर जावळीचा झेंडा फडकावला आहे. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेअंतर्गत दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘१७ वा सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार २०२६’ त्यांना जाहीर झाला असून, या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल’ (CIDC) मार्फत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाबद्दल त्यांचा हा गौरव केला जाणार आहे.
रवींद्र रांजणे यांना हा सन्मान ‘सर्वोत्तम प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग (स्टील व प्री-कास्ट)’ या श्रेणीमध्ये मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील शिरढोण येथे ‘प्रधानमंत्री आवास योजने’ (PMAY) अंतर्गत त्यांनी राबवलेल्या प्रकल्पाची दखल घेऊन हा बहुमान देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाने (आताचा नीती आयोग) १९९६ मध्ये स्थापन केलेली ‘सीआयडीसी’ ही संस्था बांधकाम क्षेत्रात शिस्त आणि व्यावसायिकता आणण्यासाठी कार्यरत आहे. अशा प्रतिथयश संस्थेचा पुरस्कार मिळवणे ही केवळ वैयक्तिक यश नसून, ते ग्रामीण भागातील तरुणांसाठी जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर रांजणे साहेबांनी महू गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील मुळे आणि दुसरीकडे आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानातील प्रगती यांचा सुवर्णमध्य साधत त्यांनी मिळवलेले हे यश आगामी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल समस्त जावळीकरांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
























