पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ : मुंबईच्या बाजारपेठेत डोक्यावर ओझे वाहून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका कष्टकरी माथाडी कामगाराच्या लेकीने यशाचे आभाळ कवेत घेतले आहे. जावली तालुक्यातील म्हसवे गावची सुपुत्री विशाखा हनमंत शिर्के (गोडसे) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करत ‘टॅक्स असिस्टंट’ (कर सहाय्यक) पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे विशाखाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून SEBC महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला असून तिच्या या यशामुळे जावली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशाखाचे वडील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत माथाडी कामगार म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विशाखाचे प्राथमिक शिक्षण कोपरखैरणे येथील मदर इंडिया स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र फकीर्जी नाईक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने पुण्यातील एस.एन.डी.टी. कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. कोणत्याही महागड्या खासगी शिकवणीचा आधार न घेता, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने घरातूनच स्व-अभ्यास (Self Study) करून हे यश मिळवले आहे. गरिबीचे चटके सोसतानाही तिने अभ्यासातील सातत्य कधीही ढळू दिले नाही, त्याचेच फळ आज तिला प्रशासकीय सेवेच्या रूपाने मिळाले आहे.
विशाखाच्या या यशामुळे मुंबईतील म्हसवे ग्रामस्थांनी तिची भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. एका कष्टकरी कुटुंबातील मुलीने राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवणे ही संपूर्ण समाजासाठी भूषणावह गोष्ट ठरली आहे. ग्रामस्थ मंडळ म्हसवे, विराट कला क्रीडा मंडळ आणि महाराजा मंडळ यांच्या वतीने विशाखाचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले विशाखाचे हे यश ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
























