पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : तक्षशीला विहार, सिद्धार्थ नगर येथे शनिवारी दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बेल एअर हॉस्पिटल, पांचगणी आणि नगरसेविका सौ. स्वाती गौतम कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात एकूण ४० दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली, तर १३० हून अधिक नागरिकांनी हाडांच्या मोफत तपासणीचा लाभ घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचे मार्गदर्शन घेतले.
या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयोजिका नगरसेविका सौ. स्वाती गौतम कांबळे यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. लोकप्रतिनिधीने केवळ शिबिराचे आयोजन न करता स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या दातृत्वाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्याच्या सोयी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ० ते १२ वयोगटातील लहान मुलांसाठी मोफत स्वर्णप्राशन ड्रॉप्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्याचा पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. उपस्थित डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांशी संवाद साधून आरोग्याबाबत जनजागृती करत योग्य आहार आणि जीवनशैलीबाबत सविस्तर सल्ला दिला.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात बेल एअर हॉस्पिटलचे संचालक फादर टॉमी यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि हॉस्पिटलच्या टीममुळे हे शिबीर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी बेल एअरचे डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
























