पांचगणी न्यूज नेटवर्क
काटवली : जावली तालुक्यातील मौजे काटवली येथे परमपूज्य दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये, यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे अत्यंत भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले आहे. वै. किसन महाराज वाघमारे, वै. गोकुळ महाराज क्षीरसागर आणि वै. हणमंत महाराज बेलोशे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उत्सव यंदा २४ व्या वर्षात पदार्पण करत असून, या ‘द्वितीय तपपूर्ती’ सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
आळंदी येथील विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कु. ज्योतीताई मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त पारायण मंडळ काटवली (मुंबई) व स्थानिक ग्रामस्थांच्या एकजुटीतून हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न होत आहे.
या सोहळ्याची सुरुवात 27 मार्च रोजी कलशपूजन आणि ग्रंथपूजनाने मोठ्या उत्साहात होणार असून, दररोज पहाटे ४ वाजल्यापासून काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि रात्री हरिजागर अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. या ज्ञानयज्ञात आळंदी आणि पंढरपूर येथील नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून भाविकांना भक्तिरसाची मेजवानी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीवर्धन महाराज महामुनी. (आळंदी ), स्वप्निल महाराज गायकवाड,समर्थ महाराज साळुंखे,अथर्व महाराज पवार, गोपीनाथ महाराज गर्जे, रामदास महाराज अढारे आणि अक्षय महाराज मालुसरे यांची प्रवचने तर पांडुरंग महाराज शेंडे (खडकी ), चैतन्य महाराज पाडळे (रामवाडी ) , रोहिदास महाराज मालुसरे, नामदेव महाराज रवळेकर (मिरजेवाडी ), संत शिरोमणी नामदेव महाराजांचे १७ वे वंशज निवृत्ती महाराज नामदास, गीतांजलिताई झेंडे (अहिल्यानगर ) सुरज महाराज जाधव (अंतवडी ) यांचे कीर्तने होणार असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सप्ताहाची सांगता शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर होणार आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पूजन झाल्यानंतर बेलोशी येथील वैकुंठवासी दत्तात्रय कळंबे महाराज समाधी मंदिरापर्यंत भव्य दिव्य दिंडी प्रदक्षिणा सोहळा काढला जाणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत कु. ज्योतीताई मतकर यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने काटवली ग्रामस्थ मंडळ, बाल हरिपाठ मंडळ, महिला बचत गट आणि जननीमाता सेवा मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्व भाविकांनी या द्वितीय तपपूर्ती सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
























