पांचगणी न्यूज नेटवर्क
करहर : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण पिढी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवत आहे, याचाच प्रत्यय जावळी तालुक्यातील पिंपळी येथे आला आहे. पिंपळी गावची कन्या सिद्धी शामराव गोळे हिची लोहमार्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे गावाच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सिद्धीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची असून तिचे वडील शामराव विठ्ठल गोळे हे ‘जयभवानी ट्रॅव्हल्स’वर ड्रायव्हर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पाच बहिणींच्या जबाबदारीसह घरची आर्थिक ओढाताण असतानाही, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सिद्धीने मिळवलेले हे यश खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरत आहे.
सिद्धीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर तिने सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. सध्या ती बीएससीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच, तिने पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. अभ्यासासाठी आणि तयारीसाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून काही काळ ती आपल्या मामांच्या गावी चौधरवाडी येथे वास्तव्यास होती. त्यानंतर तिने पाचवड येथील भगतसिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. सातारा सायन्स कॉलेज ते पाचवड असा खडतर प्रवास करत, तिने आपल्या सरावात खंड पडू दिला नाही. तब्बल सात वेळा प्रयत्न केल्यानंतरही खचून न जाता, सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोरावर तिने अखेर यशाला गवसणी घातली आहे.
एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर पोलीस गणवेश परिधान करण्याचे स्वप्न साकार केल्याने पिंपळी गोळेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाबद्दल पिंपळी ग्रामस्थ, विविध युवक मंडळे आणि सामाजिक स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसमोर सिद्धीने एक नवा आदर्श निर्माण केला असून, जिद्द असेल तर परिस्थिती कधीही आड येत नाही, हेच तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
























