पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात राबविला जाणार आहे. हस्तलिखित सातबाऱ्याचे संगणीकरण करताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे अनेक शेतकरी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच समस्या मुळापासून उपटून काढण्यासाठी तहसीलदार सचिन म्हस्के यांनी तालुक्यात विशेष शिबिरांचे नियोजन केले असून, प्रत्यक्ष गावागावांत जाऊन सातबारा दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार, सातबाऱ्यातील नावांच्या चुका, क्षेत्रातील तफावत किंवा इतर तांत्रिक नोंदी दुरुस्त करण्यासाठी हे शिबीर सुवर्णसंधी ठरणार आहे. अनेकदा संगणीकृत सातबारा निघताना जुन्या हस्तलिखित नोंदी गाळल्या गेल्या आहेत किंवा त्या चुकीच्या पद्धतीने नोंदवल्या गेल्या आहेत. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित सजांचे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी नेमून दिलेल्या तारखांना सकाळीच गावात हजर राहतील. शेतकऱ्यांना तिथेच त्यांचे जुने हस्तलिखित सातबारे आणि नवे संगणीकृत सातबारे पडताळणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने गावनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मालकमपेठ, पाचगणी, भिलार, कुंभरोशी यांसारख्या मोठ्या सजांसह एकूण १७ गावांमध्ये ही प्रक्रिया चालेल. त्यानंतर २३ आणि २४ एप्रिल रोजी मेटगुताड, पारपार, खरोशीसह इतर गावांचा टप्पा पूर्ण केला जाईल. उचाट सजासाठी २२ व २३ एप्रिल, तर अहिर सजासाठी २० आणि २१ एप्रिल ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या नियोजित दिवशी तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात हे काम चालणार आहे.
या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार सचिन म्हस्के यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी सातबाऱ्याची खात्री करून जर काही चुकीची नोंद आढळली, तर त्याच दिवशी तात्काळ अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची तातडीने छाननी केली जाईल आणि सातबारा दुरुस्त करून पुन्हा निर्दोष सातबाऱ्याचे वाटप त्याच गावात केले जाईल.” प्रशासनाच्या या ‘दप्तर आपल्या दारी’ उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात जाणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. तरी महाबळेश्वर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपले सातबारे अद्ययावत करून घ्यावेत, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
























