पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर: निसर्गरम्य महाबळेश्वर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुशी दशरथ पवार असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती.
रविवारी ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. खुशीने टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. मृत मुलीचे चुलते रमेश दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.म. रजिस्टर क्रमांक ०९/२०२६) करण्यात आली आहे.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मर्देकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. खुशीच्या निधनामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांमधील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे.
























