पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : ”तुमची मुले योग्य ठिकाणी आणि सुरक्षित हातांत आहेत, याचा विश्वास बाळगा. सरकारी शाळांमधूनच खऱ्या अर्थाने संस्कारांची पेरणी केली जाते. त्यामुळे केवळ शाळेबद्दल सकारात्मक बोलून शाळा आणि शिक्षक यांना तुमचे पाठबळ द्या,” असे प्रेरणादायी विचार वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मार्गदर्शक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी व्यक्त केले.
राजपुरी (ता. महाबळेश्वर ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, वाबळेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सतीश वाबळे, प्रोजेक्ट मॅनेजर प्रकाश वाबळे व सतीश कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजपुरी येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून सव्वा कोटी रुपयांची भव्य इमारत आकार घेत आहे. या प्रकल्पासाठी राजेंद्रशेठ राजपुरे आणि ग्रामस्थांनी जे सहकार्य दिले, त्याबद्दल वारे गुरुजींनी विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. “शाळेचा रथ ओढताना प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. मी या कार्याला कुठे हात लावला, याचे समाधान भविष्यात प्रत्येकाला मिळेल,” असे सांगत त्यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुढे बोलताना वारे गुरुजींनी नमूद केले की, राजपुरी सारख्या दुर्गम डोंगराळ भागातील ही शाळा उद्या संपूर्ण जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल. या शाळेत प्रामाणिक शिक्षक आणि त्यांना ताकद देणारे खंबीर नेतृत्व लाभले आहे. ग्रामस्थांनी जर त्यांना साथ दिली, तर येथील मुलांचे भविष्य अधिक उज्वल होईल. शाळेच्या नवीन इमारतीचे काम एखाद्या देखण्या रेस्टॉरंटलाही लाजवेल अशा दर्जाचे होत असून, येत्या दोन-तीन महिन्यांत भौतिक सुविधा सज्ज होतील. शाळेच्या अंतर्गत प्रगतीसाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी सदैव मार्गदर्शन व सहकार्य करण्याची ग्वाही देखील वारे गुरुजींनी यावेळी ग्रामस्थांना दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी गावाची पार्श्वभूमी मांडताना ग्रामस्थांच्या जिद्दीचे दर्शन घडवले. प्रतिकूल परिस्थितीत गावाने पिण्याच्या पाण्याची योजना आणि इतर विकासकामे कशी पूर्ण केली, याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला राजपुरीच्या सरपंच सौ. शितल राजपुरे, उपसरपंच शंकर राजपुरे, पोलीस पाटील अजय राजपुरे यांच्यासह अशोक राजपुरे, शांताराम राजपुरे, आनंदा राजपुरे, श्रीकांत राजपुरे, विलास राजपुरे, दत्तात्रय राजपुरे, बाळासाहेब घाडगे, मारुती राजपुरे, गजानन राजपुरे, लक्ष्मण आंब्राळे, अमित आंब्राळे, संताजी जाधव, सुरेश दुधाणे उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप राजपुरे, सर्व सदस्य, मेटगुताड, खिंगर व आंब्रळ गावचे ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या या ‘मॉडेल’ शाळेच्या कामाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
























