पाचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा: जावली तालुक्यातील सावरी येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे ठाण्याचे नगरसेवक तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केले जाणारे आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे, निराधार आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातून शिंदे कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
प्रकाश शिंदे यांनी वस्तुस्थिती मांडताना स्पष्ट केले की, ज्या ठिकाणी एमडी ड्रग्जचा साठा सापडला ती जमीन गोविंद नावाच्या शेतकऱ्याच्या मालकीची असून, तो कारखाना किंवा त्या जागेवर आपला कोणताही मालकी हक्क नाही. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला, ती जागा शिंदे यांच्या मालकीच्या जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी जमिनीच्या सातबारा उताऱ्यांचे दाखले देत सांगितले की, त्यांच्या जमिनीचा गट क्रमांक १७/१ असून कारवाई झालेल्या जागेचा क्रमांक ४/१ आहे. तसेच त्यांची वडिलोपार्जित जमीन घटनास्थळापासून तब्बल १५ किलोमीटर दूर असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वस्तुस्थितीची शहानिशा करूनच भाष्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आपल्या जमिनीवरील प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले की, तेथे कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल उभारले जाणार नसून केवळ कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचा मानस आहे. तसेच रणजीत शिंदे यांना विकलेल्या जागेचे सर्व व्यवहार कायदेशीर असून ते गावातच उपस्थित आहेत, ते फरार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ राजकीय आकसापोटी अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणातून कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध आता कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. खोटे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा प्रकाश शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या रॅकेटमधील सर्व सूत्रधारांना पोलिसांनी तात्काळ गजाआड करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
























