पाचगणी न्यूज नेटवर्क
खंडाळा (प्रतिनिधी): खंडाळा तालुक्यातील भोळी येथे विजेचा धक्का लागून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली. विठ्ठल दिगंबर चव्हाण (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल चव्हाण हे दुपारी मानेकॉलनी (भोळी) परिसरातील आपल्या शेतात ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी (भिजवण्यासाठी) गेले होते. यावेळी शेतातील विद्युत खांबात अचानक विद्युत प्रवाह उतरला होता. कामाच्या गडबडीत असताना त्यांचा या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सामाजिक कार्यात होते अग्रेसर
विठ्ठल चव्हाण हे परिसरात एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळ्खले जात. विशेषतः वारकरी आणि सांप्रदायिक कार्यात ते नेहमी हिरीरीने सहभागी होत असत. त्यांच्या अचानक जाण्याने भोळी गावासह खंडाळा तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पावरा हे करत आहेत.
























