पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आर्थिक गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून एका 73 वर्षीय वृद्ध व्यापाऱ्याला गंडा घालत त्यांच्या अंगावरील सोने लुटल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पाचगणी मुख्य बाजारपेठेत घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील मुख्य बाजारपेठेत विशाल स्टोअर्स चालवणारे माधव गजानन बोधे (वय ७३) हे नेहमीप्रमाणे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास साईबाबा मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. शिंदे पान मार्टजवळ आले असता एका अनोळखी इसमाने त्यांना थांबवले. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असून शहरात ड्रग्ज आणि बंदुका सापडल्याच्या तपासासाठी आल्याचे सांगून त्याने बोधे यांना आपले बनावट ओळखपत्र दाखवले. संशय येऊ नये म्हणून त्याने बोधे यांना गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठ्या खिशात ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी तिथे आणखी एक व्यक्ती आली आणि त्यानेही त्या भामट्याच्या सांगण्यावरून अंगावरील दागिने काढून खिशात ठेवण्याचे नाटक केले. त्यामुळे बोधे यांचा विश्वास बसला आणि त्यांनीही आपल्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन व दोन अंगठ्या काढून रुमालात गुंडाळून खिशात ठेवल्या. यावेळी त्या भामट्याने तो रुमाल आपल्या हातात घेऊन पुन्हा बोधे यांना दिला.
हा प्रकार घडल्यानंतर बोधे दर्शनासाठी साईबाबा मंदिरात गेले. मात्र, दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांनी खिशातील रुमाल तपासला असता त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भामट्याने हातचलाखीने साडेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही व्यक्ती पोलीस किंवा अधिकारी असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्यास सांगत असेल, तर त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. वाई, सातारा, मेढा आणि भुईंज परिसरातही अशाच प्रकारे लूट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे संशयास्पद व्यक्ती आढळल्यास किंवा अशा प्रकारे कोणी अंगावरील दागिने काढण्यास सांगितल्यास तातडीने न घाबरता पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच कोणालाही आपली खासगी माहिती किंवा दागिने काढून देऊ नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
























