पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचा मोठा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. दुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला वनविभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे ६ किलो (५.९८० किलो) वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत ४ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, चिपळूणहून एक व्यक्ती बसने खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये येणार आहे. या माहितीची गंभीर दखल घेत, वनविभागाच्या पथकाने १८ एप्रिल रोजी महाबळेश्वर बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या वावरणाऱ्या प्रसाद तुकाराम गोसावी (वय २८, रा. मानपाडा, डोंबिवली) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे खवले मांजराचे सुमारे ६ किलो खवले मिळून आले.
खवले मांजर हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ मधील अतिसंरक्षित प्राणी आहे. या प्राण्याची शिकार किंवा अवयवांची तस्करी करणे हा अजामीनपात्र आणि गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणी महाबळेश्वर वनविभागाने प्र.गु.रि.क्र. ०४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासाठी ३ ते ७ वर्षांच्या कारावासाची आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, तस्करीचे धागेदोरे कोठे जोडले आहेत, याचा तपास आता वनविभाग करत आहे.

सदरची धडक कारवाई सातारा उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (IFS), सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौंधळ, श्री. दिगंबर जाधव आणि महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सुनील लांडगे, वनरक्षक बी. बी. मराडे, तुकाराम निकम, संतोष काळे, विशाल जाधव, समीर उतेकर आणि गणेश वागदरे यांचा समावेश होता.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांची तस्करी किंवा शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन वनक्षेत्रपाल म. ह. मोहिते यांनी केले आहे.
























