पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : सर्वसामान्यांच्या महसुली तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी महसूल विभागातर्फे महाबळेश्वर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १० तारखेला भिलार येथील हनुमान मंदिर परिसरात, तर १५ तारखेला पाचगणी येथील भीमनगर सांस्कृतिक भवन येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामासाठी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांचा वेळ व पैसा वाचावा, या उदात्त हेतूने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
तहसीलदार सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ थेट मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मिळकत प्रमाणपत्र, अधिवास दाखला, अल्पभूधारक व शेतकरी दाखला, तसेच भूमिहीन शेतमजूर दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय, ७/१२ अभिलेखातील दुरुस्त्यांसंदर्भातील अर्ज स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली महसुली कामे मार्गी लागणार आहेत. एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
प्रशासकीय सेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करून ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मानस या अभियानातून व्यक्त होत आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेसाठी हे शिबिर एक सुवर्णसंधी असून, भिलार व पाचगणी परिसरातील नागरिकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या सक्रिय पुढाकारामुळे सरकारी कामातील क्लिष्टता कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
























