पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : विशेष प्रतिनिधी अध्यात्म, सामाजिक एकता आणि विकासाची परंपरा जपणाऱ्या गोडवली गावात ‘विठ्ठल रखुमाई मंदिर वर्धापन दिन’ आणि ‘अखंड हरिनाम सप्ताहा’च्या निमित्ताने भक्तीचा महापूर ओसांडून वाहिला. टाळ-मृदंगाच्या अखंड निनादात आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”च्या जयघोषात निघालेल्या भव्य ग्राम प्रदक्षिणेने संपूर्ण गोडवली नगरीला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या सोहळ्याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला.
भक्तिमय ग्राम प्रदक्षिणा आणि दिंडी सोहळा सप्ताहाच्या सांगता निमित्त आयोजित केलेली ‘ग्राम प्रदक्षिणा’ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांच्या मांदियाळीने मंदिर परिसर फुलून गेला होता. सजवलेली पालखी आणि हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी जेव्हा गावातून निघाले, तेव्हा वातावरण चैतन्यमय झाले. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि चिपळ्यांच्या ठेक्यावर विठ्ठल वारकरी संस्थेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी धरलेला फेर पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. महिलांनी पारंपारिक वेशभूषेत या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत फुगड्यांचा आनंद लुटला. गावातील प्रत्येक उंबरठ्यावर रांगोळ्या काढून आणि पालखीचे पूजन करून ग्रामस्थांनी या भक्ती सोहळ्याचे स्वागत केले.
मकरंद आबा पाटील या सोहळ्यादरम्यान बोलताना ना. मकरंद आबा पाटील म्हणाले की, “नरवीर तानाजी मालुसरे यांची ही जन्मभूमी अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. गोडवली गाव मी आमदार म्हणून दत्तक घेतले असून, येथील एकीच्या जोरावर अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. ग्रामस्थांनी माझ्यावर जे प्रेम केले, त्याची परतफेड मी गावाचा कायापालट करूनच करेन. उर्वरित कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही.”
या उत्सवात ह.भ.प. शारदाताई महाराज खोपडे आणि ज्योतीताई महाराज मतकर यांची रसाळ कीर्तने पार पडली. तसेच आनंदराव शाहीर यांचा भारुडाचा कार्यक्रम आणि आसपासच्या भिलार, आंब्रळ, खिंगर यांसारख्या अनेक गावांतील भजन मंडळांनी आपली सेवा रुजू केली. विशेष कौतुक झाले ते गोडवली महिला मंडळाच्या ताल नृत्य पथकाचे; त्यांनी सादर केलेल्या ‘संत गोरा कुंभार’ या जिवंत नाट्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनीही आपल्या सांस्कृतिक कलेतून गावच्या गुणवत्तेचे दर्शन घडवले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश आबा मालुसरे यांनी केले, तर आभार आर. डी. मालुसरे आणि योगेश मालुसरे यांनी मानले. या सोहळ्याने गोडवली गावच्या धार्मिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन पुन्हा एकदा सर्वांना घडवले.
























