पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : उचाट येथील पंचशील विकास सोसायटीच्या वतीने गाव आणि परिसरात २१० फणसाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामुळे भविष्यात उचाट हे गाव फणसाचे गाव म्हणून नक्कीच उदयास येईल असा विश्वास महाबळेश्वर तालुक्याचे सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सहकारी संस्थांना वृक्ष लागवड करणे व त्याचे संवर्धन करणे यासाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महाबळेश्वर अनुराधा पंडितराव यांनी आवाहन केले होते. तुला प्रतिसाद म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यात कामकाज करीत असलेल्या उचाट येथील पंचशील विकास सेवा सोसायटीचे वतीने ‘एक पेड माँ. के नाम ‘ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव, सहकारी अधिकारी प्रमोद चतुर व सुहास आंब्राळे, सोसायटी अध्यक्ष संजय मोरे , सचिव सोपान संकपाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ अनुराधा पंडितराव यांनी वनस्पतीचे महत्व व त्यापासून होणारी वायू निर्मिती उदाहरणार्थ सीएनजीची निर्मितीचे महत्त्व प्रकट केले. तसेच कांदाटी कृषी फाऊंडेशनचे संचालक श्रीधर थोरात यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले. प्रमोद चतुर यांनी वृक्ष संवर्धनचे महत्व सांगून. ग्रामीण बेरोजगारी कमी करण्यासाठी झाडा पासून मिळणारी द्रव्य तसेच पाला पाचोळा,फळे व फुले यावर प्रक्रिया करून त्याची उत्पादने तयार करावीत. याच्या विक्रीसाठी महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटन स्थळे हक्काची बाजारपेठ आहेत. आज जी फणसाची झाडे लागवड केले आहे त्यापासून ग्रामस्थांना भविष्यात नक्कीच आर्थिक आधार मिळेल. असे सांगितले.
शेवटी पंचशील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांनी कांदाटी खोऱ्यातील जनतेने या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. व ग्रामस्थ मंडळ व अधिकारी मंडळींचे आभार मानले.
चौकट: जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र पांचगणी आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर तालुक्यात ज्याप्रमाणे स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. त्याच तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलार, मधाचे गाव मांघर आहे. त्याप्रमाणेच फणसाचे गाव म्हणून उचाट हे भविष्यात निर्माण होईल आणि ग्रामीण उद्योगास चालना मिळेल असे उद्गार सुहास आंब्राळे यांनी काढले.
























