पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचत असतानाच, सोळशी विभागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विभागातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि आपत्कालीन समयी होणारी रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य अजित संकपाळ व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या सौजन्याने मौजे रामेघर येथे रुग्णवाहिकेचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे आता तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे सुलभ होणार असून, स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.
रामेघर येथे आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून हा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उतेकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कदम, संजय संकपाळ गुरुजी, सागर कदम, आनंद धनावडे, सरपंच सुनील कदम, बाळकृष्ण कदम गुरुजी, शिवसेना नेते शंकरदादा कदम, सुरेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष रॅली आणि आरोग्य सुविधांच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, असा आदर्श या उपक्रमातून समोर आला आहे.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने गावात धार्मिक व सामाजिक कार्याची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या मंगलमयी वातावरणात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात दिसून आला. दुर्गम भागातील जनतेची खरी गरज ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित संकपाळ यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, रामेघर ग्रामस्थांनी या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन केले होते.
























