पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या ‘डिजिटल अंधारात’ चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल नेटवर्कची सेवा पूर्णपणे कोलमडली असून, नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही (आयडिया) यांसारख्या नामवंत कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, ‘स्मार्ट’ पाचगणी आता ‘आऊट ऑफ कव्हरेज’ गेल्याचे चित्र दिसत आहे.
डिजिटल व्यवहारांना यामुळे ‘ब्रेक’लागला असून पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम ऐन भरात असतानाच नेटवर्कने दगा दिल्याने पाचगणीच्या अर्थचक्राला खीळ बसली आहे. हॉटेल बुकिंग, ऑनलाईन पेमेंट, आणि पर्यटकांची माहिती देवाणघेवाण करणे कठीण झाले आहे. अनेकवेळा हॉटेलमध्ये चेक-इन करताना किंवा क्युआर कोड स्कॅन करताना नेटवर्क नसल्याने पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागते, ज्यामुळे शहराच्या पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. केवळ पर्यटकच नव्हे, तर ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि घरून काम (Work from Home) करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
बड्या कंपन्यांची अनास्था आणि तांत्रिक गलथानपणा दिसून येत असून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात वीज पुरवठा खंडित झाला की लगेच मोबाईल नेटवर्कही गायब होते. यावरून संबंधित कंपन्यांच्या टॉवरवर पुरेशी बॅकअप यंत्रणा किंवा इन्व्हर्टर नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी वीज गेल्यावर दिवसभर शहराची कनेक्टिव्हिटी तुटली होती, त्यामुळे ग्राहकांना दिवसभर संपर्क क्षेत्राबाहेर राहावे लागले. दुसरीकडे, जिओ टॉवर असलेल्या जागा मालकांच्या भाडेपट्ट्यावरून काही घरगुती वाद निर्माण झाले असून, त्या वादाचा फटका संपूर्ण शहराला बसत असल्याची चर्चा नाक्यानाक्यावर ऐकायला मिळत आहे.
या कंपन्याचे महागडे प्लॅन्स आहेत मात्र सेवा शून्य असल्याचे दिसून येत आहे. एकिकडे टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे दर गगनाला भिडवले आहेत, मात्र त्या तुलनेत दर्जेदार सेवा देण्यात कंपन्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कंपन्यांचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाचगणीकरांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशेषतः जिओचे नेटवर्क पूर्णपणे गायब असल्याने लोकांचा संयम सुटत चालला आहे.
जर लवकरात लवकर ही नेटवर्कची समस्या सुटली नाही, तर पाचगणीतील संतप्त नागरिक आणि व्यावसायिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. पर्यटनस्थळाची ही विदारक स्थिती सुधारावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
























