पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी:खिंगर आणि भौसे परिसरातून घराच्या अंगणातील तांब्याचे पाण्याचा बंब चोरणाऱ्या टोळीला पाचगणी पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी संस्कार दत्तात्रय गायकवाड (रा. इंदवली, जावली), सयाजी हिंदूराव मदने (रा. बोबडेवाडी, खटाव) आणि इतर दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे बंब आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, प्रभाळे गल्ली परिसरातून बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या कन्हैयालाल मौर्या यालाही पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. पाचगणी पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
























