पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाचगणी पोलिसांनी आज शहरातून भव्य बाईक रॅली काढून नागरिकांना सुरक्षा आणि शांततेचा संदेश दिला. मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. API पवार यांच्यासह पोलिस पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य मार्गावरून ही फेरी काढ्यात आली.
दांडेघर नाका येथील अर्हनगर येथून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, टेबल लँड नाका, बेबी पॉईंट आणि एस.टी. स्टँड परिसर या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत संपूर्ण शहराला फेरी मारली. बाईक रॅली, पोलीस वाहनांचे सायरन आणि पोलिसांची शिस्तबद्ध रांग यामुळे शहरातील गर्दीच्या भागांत पोलिसांच्या उपस्थितीची ठोस जाणीव नागरिकांना झाली आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रॅलीच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना निवडणुकीदरम्यान शांतता राखणे, आचारसंहितेचे पालन करणे आणि बेकायदेशीर कृत्ये टाळण्याबाबत संदेश दिला. तसेच, कोणताही गोंधळ होणार नाही आणि संशयास्पद हालचालींवर सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.” तसेच, नागरिकांनी शांततेत आणि कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या बाईक रॅलीमुळे निवडणूकपूर्व काळात पाचगणी शहरात शांतता आणि सुरक्षिततेचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे. निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
























