पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले ‘बालविवाह’ उरकून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गांभीर्याने घेत महाबळेश्वरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. सचिन म्हस्के यांनी बालविवाह रोखण्यासाठी कंबर कसली असून संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार सचिन म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार “तालुक्यात एकही बालविवाह होणार नाही, हे आमचे ध्येय असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा थेट इशाराच प्रशासनाने दिला आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार, मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. केवळ पालकांवरच नाही, तर या विवाहात सहभागी होणारे नातेवाईक, भटजी (पुरोहित), मंगल कार्यालय मालक, वाजंत्री आणि पत्रिका छापणारे अशा सर्वांवर कठोर कारवाईची टांगती तलवार आहे. या गुन्ह्यासाठी २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख रुपये दंडाची कडक तरतूद आहे. त्यामुळे विवाहापूर्वी वयाची खात्री करणे ही सर्वांची कायदेशीर जबाबदारी आहे.
तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रशासनाने आपले जाळे विणले आहे. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचे विशेष पथक अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार आहे. शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मंगल कार्यालये आणि लॉन्स मालकांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की, वर-वधूच्या वयाचे अधिकृत पुरावे (जन्म दाखला किंवा बोनाफाइड) तपासल्याशिवाय कोणतेही बुकिंग घेऊ नये.
बालविवाह ही केवळ कायद्याची पायमल्ली नसून ती एक सामाजिक अनिष्ट प्रथा आहे, ज्यामुळे बालकांचे आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. आपल्या परिसरात कुठेही गुपचूप बालविवाह होत असल्याची कुणकुण लागल्यास नागरिकांनी तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही तहसीलदार सचिन म्हस्के आणि तालुका संरक्षण अधिकारी श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
”बालकांचे बालपण वाचवणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. महाबळेश्वर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी समाजाने प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे.” श्री. सचिन म्हस्के, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, महाबळेश्वर.
























