पाचगणी न्यूज नेटवर्क ।
पांचगणी: सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पांचगणी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅप्रो-कप आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धे’ मध्ये पांचगणीच्या न्यू-इरा हायस्कूल संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी सातारा येथील शानबाग स्कूल संघाचा ३३-१७ अशा १६ गुणांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला.
सेंट झेविअर्स हायस्कूलच्या भव्य मैदानावर या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मॅप्रो फूड्स प्रा. लि. यांचे विशेष सौजन्य लाभले. या स्पर्धेत पांचगणी, सातारा, लोणंद आणि सोलापूर अशा विविध शहरांमधील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. बास्केटबॉल असोसिएशन, सातारा यांच्या अनुभवी पंचांच्या उपस्थितीत सर्व सामने अत्यंत उत्साहात पार पडले.
अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला, ज्यात न्यू-इरा हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन करत शानबाग स्कूलला कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी ३३-१७ गुणांनी मात करत संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. या पराभवामुळे साताऱ्याचे शानबाग हायस्कूल उपविजेते ठरले, तर पांचगणी येथील सेंट पीटर्स हायस्कूल संघाने तिसरे स्थान पटकावले.
पुरस्कार वितरण समारंभ सेंट झेविअर्स हायस्कूलचे संचालक फादर टॉमी, मुख्याध्यापक फादर साबू व फादर जिंटो यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
समारोप प्रसंगी बोलताना संचालक फादर टॉमी म्हणाले की, “खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवा अनुभव मिळावा यासाठी ही मॅप्रो-कप बास्केटबॉल स्पर्धा सेंट झेविअर्स हायस्कूलच्या वतीने यापुढे दरवर्षी आयोजित केली जाईल. विविध जिल्ह्यांतील शाळांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” यावेळी सर्व सहभागी संघांचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
























