पाचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या 2025 च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये निर्माण झालेला अंतर्गत वाद आणि संभाव्य बंडखोरी अखेर संपुष्टात आली आहे. पक्षाचे आमदार मंत्री मकरंद पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल करणारे अनुभवी कार्यकर्ते नासिर मुलाणी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे, पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील शिंदे यांच्या विरोधात निर्माण झालेला अडथळा दूर झाला असून राष्ट्रवादी आता एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने सुनील शिंदे यांना तिकीट जाहीर केले होते. मात्र, पक्षातील ज्येष्ठ आणि इच्छुक असलेले नासिर मुलाणी यांनी शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली होती. मुलाणींच्या या निर्णयामुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा विरोधकांना होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ची भूमिका घेतली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी दोन्ही गटांमध्ये समेट घडवण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली, वरिष्ठांशी सल्लामसलत केली आणि स्थानिक पातळीवरील नाराजी दूर करण्याचे कसोशीने प्रयत्न केले. निवडणुकीतील विजयासाठी “एकी हाच महामंत्र” या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि त्यांनी पक्षातील शिस्त व एकसंधतेचे महत्त्व मुलाणींना पटवून दिले.
आमदार पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आणि समजुतीनंतर अखेर नासिर मुलाणी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील बंडखोरीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. सुनील शिंदे यांची उमेदवारी आता स्थिर झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
अजित पवार गटाने महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत, यावरून ते निवडणुकीत आपली ‘फुल स्ट्रेंथ’ उतरवत असल्याचे स्पष्ट होते. मुलाणींच्या माघारीमुळे पक्ष आता एकचित्ताने आणि नव्या ऊर्जेने प्रचाराच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
























