पाचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर, ता. १५ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज महाबळेश्वर येथे शिवसेनेला मोठे बळ मिळाले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-Sharadchandra Pawar ho महाबळेश्वर तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे यांनी आपल्या शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री शिंदे
या सोहळ्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अधूरा राहिलेल्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले. ‘महायुती सरकार फक्त घोषणा करत नाही, तर काम करून दाखवते,’ असे सांगत त्यांनी विरोधकांच्या अफवांवर टीका केली.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले. “कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी गरीब आणि गरजू भगिनींसाठी असलेली ही योजना सुरूच राहील. येणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण नक्कीच भगवा फडकवाल, अशी माझी अपेक्षा आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई यांना महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांवर जातीने लक्ष ठेवण्याची सूचना केली.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संघटक शरद कणसे, जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारंडे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले सुभाष कारंडे हे महाबळेश्वरच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडों कार्यकर्त्यांनी केलेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी (शरदचंद्र पवार) मोठा धक्का मानला जात आहे. कारंडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद गावपातळीपर्यंत वाढण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केला.
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना मजबूत
तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या या प्रवेशामुळे आगामी नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद आणि उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल, ज्यामुळे महाबळेश्वर आणि परिसरात महायुतीचे स्थान अधिक मजबूत होईल.
























