पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: पाचगणी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आज छाननी प्रक्रियेदरम्यान मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. माजी नगराध्यक्ष लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या उमेदवारी अर्जावर माजी नगराध्यक्ष अनिता चोपडे यांनी आक्षेप घेत थेट जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान दिले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत जाधव आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर कऱ्हाडकर यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरवले. या निर्णयानंतर कऱ्हाडकर गटाने पाचगणीत सायंकाळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही पाचगणीच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. प्रभाग क्रमांक ७ (ओबीसी आरक्षण) मधून लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात कोण उभे राहणार, याबद्दल शेवटपर्यंत उत्सुकता होती. अखेरच्या टप्प्यात ना. मकरंद आबा पाटील गटाने अनिता चोपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. चोपडे यांनी कऱ्हाडकर यांना आव्हान देण्याच्या उद्देशाने अर्ज भरल्याचे स्पष्ट झाल्यावर, कऱ्हाडकर यांनीही सावध पवित्रा घेत प्रभाग क्रमांक ८ मधून आपला दुसरा पर्यायी अर्ज दाखल केला. कऱ्हाडकर यांनी दोन अर्ज दाखल केल्याने शहरात दिवसभर जोरदार चर्चांना उधाण आले होते.
जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप, अखेर युक्तिवाद फेटाळला
आज छाननीच्या वेळी अनिता चोपडे यांनी कऱ्हाडकर यांच्या अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हरकत घेतली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कसून युक्तिवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम आणि अटींच्या आधारे विचारविनिमय करून सौ. चोपडे यांनी घेतलेली हरकत फेटाळली आणि लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा उमेदवारी अर्ज संपूर्णपणे वैध ठरवला.
निकाल लागताच विजयाचा जल्लोष
हा निकाल जाहीर होताच लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या कार्यकर्त्यांनी पाचगणी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून निवडणुकीपूर्वीच जणू आपला विजय साजरा केला. कऱ्हाडकर यांनी यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला आनंद द्विगुणित केला.
राजकीय समीकरणे स्पष्ट: नगराध्यक्षपदाचे उमेदवार कऱ्हाडकरांच्या मदतीला
आज दिवसभर छाननी सुरू असताना निकाल लागेपर्यंत माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर ह्या पालिकेत थांबून होत्या. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कांबळे हे देखील ठामपणे उपस्थित होते. यामुळे, लक्ष्मी कऱ्हाडकर यांना संतोष कांबळे यांचेच खंबीर समर्थन असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
























