पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त उद्या रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात भव्य आणि लक्षवेधी शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पाचगणीतील मुख्य बाजारपेठ भगव्या ध्वजांनी नटली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शाही मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ पाचगणी शहरच नव्हे, तर परिसरातील खिंगर, आंब्रळ, गोडवली, राजपुरी, दांडेघर, गणेश पेठ, भोसे, भिलार, शाहूनगर आणि पांगारी या ग्रामीण भागातील शिवप्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. फुलांनी सजवलेला शिवरायांचा पालखी सोहळा, पारंपारिक ढोल-ताशांचा गजर आणि शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके यामुळे पाचगणीत अक्षरशः शिवसृष्टी अवतरणार आहे.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. विशेषतः तरुण वर्गामध्ये या उत्सवाबाबत मोठा उत्साह असून, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक वेशभूषेत शिवभक्त या शोभयात्रेत सामील होणार आहेत.
उद्या सायंकाळी निघणाऱ्या या मिरवणुकीने पाचगणीचा आसमंत भगवामय होणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीनेही वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले आहे. सर्व शिवप्रेमींनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
























