पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न आणि शहराच्या पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी उद्या बुधवारी महाबळेश्वर येथे एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जनतेच्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी असल्याचे पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले यांनी स्पष्ट केले आहे.
ही बैठक महाबळेश्वर येथील हॉटेल गौतम येथे दुपारी १ वाजता होणार आहे. महाबळेश्वर तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ असल्याने उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे, तसेच ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य आणि शिक्षण विषयक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व शासकीय खात्यांचे प्रमुख उपस्थित राहणार असून, त्यांच्याकडून विविध विकासकामांचा आढावा मंत्री मकरंद आबा पाटील घेणार आहेत.
या बैठकीसाठी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगरपालिकांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती शकुंतला चोरमले यांनी केले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असून, जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपल्या समस्यांसह या बैठकीला उपस्थित राहावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
























