पाचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे
पांचगणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पाचगणी नगरपालिकेच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे सभापती, नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि त्यांनी दिलेल्या संविधानाची समाजाला असलेली गरज अधोरेखित केली. पालिकेच्या वतीने शहरात जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या विशेष सजावटीची आणि नियोजनाचीही यावेळी उपस्थितांनी पाहणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाचगणी शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. पालिकेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याची विशेष सोय करण्यात आली होती. शहरातील मुख्य चौकांमध्ये पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाच्या वतीने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून महामानवाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
























