पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सामान्य कुटुंबातून पुढे येऊन उद्योग व्यवसायात यशस्वी झाल्यावर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव ठेवणे हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख आहे. स्वरा एंटरप्रायझेसने आज शैक्षणिक सुविधांसाठी जे दातृत्व दाखवले आहे, ते केवळ कौतुकास्पद नसून समाजातील इतर उद्योजकांसाठी एक उत्तम वस्तुपाठ आहे, असे गौरवोदगार जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी काढले. गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील प्राथमिक शाळेत राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंच आणि स्वरा एंटरप्रायझेसच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वाटप सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोंडारवाडी, दानवली, गुरेघर, अवकाळी आणि धनगरवाडी या परिसरातील शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाबळेश्वरच्या सभापती शकुंतला चोरमले, सरपंच रमेश चोरमले, स्वरा एंटरप्रायजेसचे संस्थापक संदीप वाडकर, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, रोटरीचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे, माजी सरपंच जाणू पांगारे, अभय डोईफोडे, सुहास भिलारे, अशोक भिलारे, सुशील गोळे, सुनील बिरामने यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्रशेठ राजपुरे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील पालकांनी मराठी शाळांवर नितांत प्रेम केले आहे. त्यांच्या या निष्ठेला साजेसे सहकार्य देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत. आदरणीय मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या पूर्व भागात आज अनेक शाळा आदर्शवत झाल्या आहेत. संदीप वाडकर यांच्यासारखे तरुण उद्योजक पुढे येऊन शाळांना भौतिक सुविधा पुरवत आहेत, हे पाहून आनंद होतो. आता ही जबाबदारी शिक्षकांनी समर्थपणे पेलावी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणेच आपल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्यात बोलताना जाणू पांगारे आणि सरपंच रमेश चोरमले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चोरमले यांनी केले, तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी रोटरीचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षण क्षेत्रातील या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, स्वरा एंटरप्रायझेसच्या या सामाजिक बांधिलकीचे सध्या परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे
























