पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : नवनिर्वाचित सभापती सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर पंचायत समितीची पहिलीच मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २७) कै. एम. आर. भिलारे सभागृहात संपन्न झाली. पहिल्याच सभेत नव्या सभापतींनी प्रशासकीय कामकाजाचा आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांचा सखोल आढावा घेत जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी उपसभापती संजय मोरे, गट विकास अधिकारी विजय विभुते यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव सौ. वंदना भिलारे यांनी मांडला, ज्याला संजय विठ्ठल शेलार यांनी अनुमोदन दिले आणि सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या नेतृत्वाचे स्वागत केले. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची गावनिहाय प्रगती तपासण्यात आली. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचे आणि पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
आरोग्य विभागाने राबवलेल्या लसीकरण मोहिमेचे सभेत विशेष कौतुक करण्यात आले, तर पशुसंवर्धन विभागाच्या योजनांबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अधिकाऱ्यांनी निरसन केले. गट विकास अधिकारी विजय विभुते यांनी पारदर्शक आणि गतिमान प्रशासनावर भर देण्याचे आवाहन केले. सभेच्या शेवटी, सेवानिवृत्त होत असलेले सहाय्यक गट विकास अधिकारी रामचंद्र जगताप यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सभेचे कामकाज प्रभाकर शेंडे, दिनकर जाधव व श्रीकांत धनवडे यांनी पाहिले, तर विस्तार अधिकारी रमेश ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रशासनाला स्पष्ट निर्देश
ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि शिक्षण या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील राहणे गरजेचे आहे. कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता यावर आमचा विशेष कटाक्ष असेल. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
— सौ. शकुंतला रमेश चोरमले (सभापती, पं. स. महाबळेश्वर)
























