पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी,(प्रतिनिधी):निसर्गरम्य पाचगणी शहर आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने आणि रामनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेले. राम जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरात भक्ती आणि उत्साहाचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात अबालवृद्धांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
श्रीराम उत्सव समिती, श्रीराम चौक आणि परिसरातील विविध मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य मिरवणूक या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होती. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठ आणि एस. टी. स्टँडमार्गे निघालेल्या या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या पथकांनी सादर केलेल्या गजनाने परिसर भारावून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, तर शेकडो महिलांनी हाती टाळ घेऊन भजनांच्या सुरावटीत रामनामाचा गजर केल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले.
मिरवणुकीनंतर श्रीराम चौक येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि महाआरती संपन्न झाली. यावेळी पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मुख्याधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, नगरसेवक राजेंद्र पार्टे, गणेश कासुर्डे, अमित कांबळे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, माधुरी कासुर्डे, लक्ष्मी कऱ्हाडकर, अभिलाषा कऱ्हाडकर, नंदिनी बुटाला, बापू बिरामने, हणमंत बिरामने आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते भक्तिभावाने आरती करण्यात आली.
दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. सायंकाळी आयोजित सुस्वर भजन आणि दीपोत्सवामुळे पाचगणीच्या मुख्य चौकात भक्तीचा ओघ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे उत्सव अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडला. श्रीराम उत्सव समिती आणि परिसरातील विविध मंडळांनी केलेल्या नियोजनामुळे यावर्षीचा राम जन्मोत्सव सोहळा सामाजिक ऐक्य आणि परंपरेचा नवा आदर्श ठरणारा ठरला.
























