पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सध्या एका विशेष भेटीमुळे चर्चेत आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांसह बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अमीर खान याच्या पाचगणी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गज एकाच छताखाली आल्याचे पाहायला मिळाले.
अमीर खान यांचे पाचगणीशी असलेले नाते अत्यंत जुने आणि जिव्हाळ्याचे आहे. त्यांचे लग्नही याच ठिकाणी झाले असून, तेव्हापासून ते स्वतःला ‘पाचगणीकर’ मानतात. धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा मिळवण्यासाठी अमीर खान अनेकदा आपल्या पाचगणीतील घरी मुक्कासाला येतात. यावेळी मंत्री मकरंद आबा पाटील यांनी त्यांची भेट घेतली असता, कला, सामाजिक प्रश्न आणि सध्याच्या समकालीन विषयांवर दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली.
- या भेटीदरम्यान केवळ गप्पाच रंगल्या नाहीत, तर समाजकारणात कलेचे महत्त्व आणि ग्रामीण विकासातील योगदानावरही विचारमंथन झाले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीणशेठ भिलारे, तहसीलदार सचिन म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नियोजन समिती सदस्य प्रवीणशेठ भिलारे आणि नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र पारठे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे ‘लगान’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमीन हाजी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला, ज्यामुळे या बैठकीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

मंत्री पाटील यांनी अमीर खान यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले, तर अमीर खान यांनीही पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणाबद्दल आणि इथल्या लोकांशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि कला क्षेत्रातील सर्जनशीलता यांचा हा मिलाफ उपस्थित मान्यवरांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. ही सदिच्छा भेट आगामी काळात कला आणि समाजकारणाच्या दृष्टीने सकारात्मक ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
























