पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: सुरुर – पोलादपूर या अत्यंत महत्त्वाच्या राज्य महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असले तरी, या कामामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या कामातील नियोजनाचा अभाव, धुळीचे साम्राज्य आणि निकृष्ट दर्जाबाबत पाचगणीकरांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला.
येथील रोटरी क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले. या बैठकीत झालेल्या तीव्र चर्चेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चुकांची कबुली देत, इथून पुढचे काम नागरिकांना त्रास न देता आणि पूर्ण गुणवत्तेसह करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरुर-पोलादपूर मार्गाचे काम संथ गतीने आणि विस्कळीत स्वरूपात सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लबमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला रेसिडेंट इंजिनियर सी. व्ही. कृष्णा, टीम लीडर मोहन हांडे आणि कंत्राटदार कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला सुरुवात होताच उपस्थित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. रस्ता खोदल्यानंतर तो तसाच उघडा ठेवणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था न करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला. विशेषतः रस्त्यालगत असलेल्या जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडल्याने आणि त्यांना इजा पोहचल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “विकास हवा आहे, पण तो लोकांच्या जिवावर उठणारा नसावा,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. रस्त्याच्या कामात वापरले जाणारे साहित्य आणि डांबरीकरणाच्या दर्जाबाबतही अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. तासनतास चाललेल्या या चर्चेनंतर शासकीय अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. नियोजनात त्रुटी राहिल्याचे मान्य करत, सध्या ज्या ठिकाणी रस्ता अत्यंत खराब झाला आहे, तिथे तातडीने डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देण्यात आले.
तसेच, इथून पुढे झाडांना कोणतीही हानी पोहोचणार नाही आणि कामाच्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारून धुळीचे प्रदूषण रोखले जाईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांनी सुचवलेल्या प्रत्येक सूचनेची नोंद घेतली असून, कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. या बैठकीमुळे पाचगणीतील जागरूक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संवाद पुन्हा प्रस्थापित झाला असून, आता प्रत्यक्ष कामात किती सुधारणा होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
























