
पांचगणी न्यूज नेटवर्क
तळदेव : दऱ्या खोऱ्यात व दुर्गम ठिकाणी शिक्षणाचे काम करणाऱ्या कोयना एज्युकेशन संस्थेची प्रगती आणि भरभराट होण्यात संस्थेचे सचिव डी के जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना समाज सुधारणेची तळमळ बाळगून काम करणारा पंच्याहत्तरितील तरुण डी. के. जाधव यांचा या वयातही असणारा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. त्याचं सर्व सामाजिक कार्य हे आमच्यासारख्यांना प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी काढले.
तळदेव (तालुका महाबळेश्वर ) येथील कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवचे सचिव डी. के .जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ना.मकरंद पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रंशेठ राजपुरे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे , बाबुराव संकपाळ, संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव, मारुती फळणे , बी. व्ही. शेलार, धोंडीराम जंगम, तानाजी बाबर, उद्योजक वसंत शिंदे, घनश्याम संकपाळ, किसनशेठ भिलारे, गणपत पार्टे, जावळी बँक संचालक गणेश भोसले, विठ्ठल धनावडे, धोंडीबाशेठ धनावडे, रमेश धनावडे, तुकाराम धनावडे, विजय झरेकर, ओंकार भोसले, आनंद धनावडे, चिन्नाशेठ , दापवडी सरपंच महादेव रांजणे, सावली सरपंच विजय सपकाळ तसेच कोयना संस्थेच्या सर्व संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक , जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून जाधव कुटुंबांच्या वतीने वही तुला करण्यात आली. आलेल्या सर्व वह्या शाळेतील मुलांना वाटप करण्यात येणार आहे. 
सरकारला उत्तर देताना डी. के. जाधव म्हणाले माझे हातून झालेली सर्व कामे ही तुम्हा सर्वांच्या सहकार्य आणि प्रेरणेतून घडली आहेत. मी अजूनही काम करीत आहे ते तुमच्या सर्वांच्या व कुटुंबाच्या पाठबळावर. यापुढेही मी पुढील फक्त पाच वर्ष काम करणार आहे. संस्थेच्या सर्व शाळा संगणकीकृत आणि प्रयोगशाळा युक्त करणार असून नंतरच मी निवृत्त होणार असण्याचे सांगितले.
तळेश्वर मंदिरात सत्कार चालू असताना पर्जन्य राजाने हजेरी लावल्याने अनोखा योगायोग जुळून आला. सर्व शुभेच्छा कर्त्यांनी डी के जाधव यांना आम्हाला १०० वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य मिळावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी डी. के जाधव यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फोनवरून अभिष्टचिंतन केले. तर सर्व स्तरातील मान्यवर व नागरिकांनी जाधव यांनाच शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जंगम व वैशाली साळुंखे मॅडम यांनी केले तर अनुप जाधव यांनी आभार मानले.
डी. के. जाधव यांना वाचनाची खूप आवड असल्याने उपस्थित राहिलेल्या सर्वांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक भेट देण्यात आले. जेणेकरून वाढदिवसातून त्यांनी वाचन संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. शाल, नारळ,फुल देऊन होणाऱ्या सत्काराला फाटा देत अशा या अनोख्या आदर सत्काराने सर्वजण भारावून गेले.
























