पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : जावलीची राजधानी समजल्या जाणाऱ्या मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मेढा येथील कलश मंगल कार्यालय येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार असून, यामध्ये उद्योजक राजेंद्र धनावडे (केळघर) यांना मानाचा स्व. विजयराव मोकाशी ‘जलयोद्धा पुरस्कार’, तर पांडुरंग जवळ (मेढा) यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, कार्याध्यक्ष नारायण शिंगटे व सचिव धनंजय पवार यांनी दिली आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले भूषवणार असून, मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, प्रसिद्ध लेखक प्रा. आनंद साठे, ज्येष्ठ पत्रकार धनराज जगताप, मेढ्याच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली वारागडे व उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्य सोहळ्यापूर्वी दुपारी १२ वाजता ‘जावली साहित्य प्रेमी’ यांच्या सहकार्याने तालुक्यातील नवोदित कवींचे भव्य ‘काव्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. तसेच यावेळी मेढा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व नगरसेवकांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने जाहीर झालेल्या अन्य पुरस्कारांमध्ये कै. शामराव बापुराव क्षीरसागर स्मृती ‘जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार’ दीपक लंगडे (दहिवडी) यांना, तर स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे स्मृती ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ सौ. सुनीता अजय दिघे (आंबेघर) यांना प्रदान केला जाईल. तसेच राजेंद्र काशिनाथ माने (सातारा) यांना ‘आदर्श ग्रंथपाल’, शाहीर श्रीरंग रणदिवे यांना ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता’, विजय कारंजकर यांना ‘यशस्वी उद्योजक’ आणि पांडुरंग महादेव देशमुख यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. सौ. रत्ना रवींद्र शेलार व श्रीमती लक्ष्मी ज्ञानेश्वर शेडगे यांना ‘आदर्श माता’, तर सौ. सुनीता प्रताप कामटे यांना ‘आदर्श शिक्षिका’ आणि सौ. गौरी रणजीत ओंबळे, वर्षा देशमुख, श्रुती शिंदे यांना ‘आदर्श महिला वाचक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. जावलीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या सोहळ्यास तालुक्यातील साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथपाल आशा मगरे व वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी, संचालकांनी केले आहे.
























