ज्याच्या नावात देव…वागण्यात विनम्रता…मुखी सदैव राम कृष्ण हरीचा उच्चार…. कपाळी पांडुरंगाचा टिळा…..सभोवतालच्या समाजाच्या परिवर्तनाची तळमळ…समाजसेवेत नेहमीच सर्वांच्या पुढे असणाऱ्या आणि गाव स्मार्ट बनवण्यासाठी अखंडपणे गावाला बरोबर घेवून झटणारा ऐक कार्यकर्ता काटवली गावाच्या विकासाची हनुमान उडी म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते त्या जावळी तालुक्यातील स्मार्ट ग्राम काटवलीचे माजी सरपंच हणमंतराव बेलोशे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यामुळे काटवली गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचेवर उद्या (शनिवार) सकाळी 10 वाजता काटवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
तस पाहिलं तर माजी सरपंच हणमंतराव बेलोशे हे काट वली गावबरोबरच अख्या भागाला हवहवस हरहुन्नरी व्यक्तिमत्व होत. सर्वसामान्य कुटुंबातील जन्मलेले हणमंतराव….आपल्या पोटापाण्यासाठी अलिबागला गेले. अलीबाग येथे राहून उद्योग व्यवसाय करीत असताना अनेक लोकांना त्यांनी मदतीचा हात देत सरपंच यांनी आपली एक वेगळी चमक दाखवली. परंतु काम करीत असताना ते काम प्रामाणिकपणे करायचं ही जिद्द त्यांच्या मनात होती. अलिबागला असताना तेथील स्थानिक आमदारांकडे नोकरी करताना समाजमनाशी ते जोडले गेले. त्यामुळे त्यांना समाजसेवेची आवड आपोआप निर्माण झाली. अलिबाग येथेच आपल्या संसाराची वीण जोडली आणि ते पाहता पाहता कोकणवासीय कधीं झाले हे समजलेच नाही.
पण गावाची ओढ त्यांना कायम होती. काही दिवसानी हणमंतराव यांनी आपल्या आयुष्याची रेषा बदलण्याचा संकल्प केला आणि थेट आळंदी गाठली. या ठिकाणी त्यांचे गुरु वैकुंठवासी गोकुळ महाराज क्षीरसागर यांच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचा वसा घेतला या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षणाची कला त्यांनी आत्मसात केली. तेथेही त्यांनी गोकुळ महाराज यांना मोलाची साथ दिली. ती आज शेवटपर्यंत होती. आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह पाच दिवसाचा करण्यास हणमंतराव यांचा वाटा सिंहाचा होता.
प्रत्येक कामाला पुढे असणारे हणमंतराव गावात आले आणि त्यांनी केव्हा सरपंच पदावर उडी मारली हे त्यांना समजलेच नाही. पण सरपंच म्हणून काम करताना गावच्या विकासाबरोबरच उच्च प्रतीचे काम करून आपल्या गावाला त्यांनी स्मार्ट बनवणे. गांवच्या अथक परिश्रमाची जोड त्यांना मिळाली. समाजाची ओळख असलेल्या हनुमंतराव बेलोशे यांनी 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य पद मिळवले. परंतु त्यावेळी त्यांनी म्हणावे तसे समाधान होऊ घातले नाही परंतु नंतरच्या काळात सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हनुमंतराव बेलोशे यांनी गावाच्या विकासाचा सेतू उभा केला.
गावातील सर्व स्तरातील लोकांना आपल्या बरोबर घेऊन हनुमंतराव बेलोशे गावासाठी नियमितपणे झटत होते. अगदी पाणी योजना असूद्या ,रस्ते असुद्यात, बंधारे, गटर असुद्यात अगदी तळमळीने काम करीत गेली पाच वर्ष आपल्या सरपंच पदाचा कार्यभार त्यांनी चढत्या आलेखाप्रमाणे ठेवला आणि गावाचे नाव सर्वत्र तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात मोठे केले. गावाच्या विकासासाठी झटणारा हा नेता कशाचीही पर्वा न करता आपल्या दुचाकीवरून नेहमी शासकीय कार्यालयात पाहिलेला मला दिसतो. तळमळीने काम करीत स्मार्टग्राम करण्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आणि गाव स्मार्ट करून दाखवले.
सरपंच पद असो वा नसो काम करण्याची ऊर्मी मनात बाळगून नेहमी समाजासाठी झटणारा हा कार्यकर्ता कुठेही सापडणार नाही. हणमंतराव बेलोशे यांनी केलेली कामाची गणती करणे अवघड आहे.
अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला हा आज मुकला आहे. सरपंच तुमच जाणे म्हणजे आमच्या गावची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. सरपंच तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली….
























