पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : माणूस गेल्यानंतर मागे उरतात त्या फक्त आठवणी… पण काही माणसे आपल्या कर्तृत्वाने आणि जिव्हाळ्याने लोकांच्या हृदयात असं अढळ स्थान निर्माण करतात की, त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबच नाही तर संपूर्ण पंचक्रोशी पोरकी होते. खिंगर गावचे माजी सरपंच आणि महाबळेश्वर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष स्व. अशोकराव दुधाणे यांच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने याचाच प्रत्यय आला. काल पार पडलेल्या या सोहळ्यात शब्दांपेक्षा अश्रूच जास्त बोलके ठरले.
राजेंद्रशेठ राजपुरे यांचे मौन बरंच काही सांगून गेलं
कार्यक्रमात बोलण्यासाठी उभे राहिलेले जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे हे आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्याच्या आठवणीने पूर्णपणे निःशब्द झाले. राजकारणात अनेक चढ-उतार पाहिलेल्या या नेत्याला आपल्या कार्यकर्त्याच्या आठवणीने शब्दच सुचले नाहीत. त्यांच्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू पाहून उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला. एका नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावर किती निस्सीम प्रेम असू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण होतं. “काही नाती रक्ताच्या पलीकडची असतात, अशोकरावांचं जाणं हे माझ्या वैयक्तिक आयुष्यातील कधीही न भरून निघणारी पोकळी आहे,” हीच भावना त्यांच्या न बोलण्यातून व्यक्त होत होती.
पंधरा दिवसांपूर्वी खिंगर गावाचे ‘चालते बोलते विद्यापीठ’ म्हणून ओळखले जाणारे अशोकराव आपल्याला सोडून गेले. आपल्या वडिलांचे नाव गावातील चौकाला मिळावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. परंतु, नियतीने त्यांना हे पाहण्यापूर्वीच हिरावून घेतले. ग्रामस्थांनी मात्र आपल्या लाडक्या सरपंचांचे प्रेम स्मरणात ठेवून, त्यांच्या इच्छेचा मान राखत त्याच चौकाला ‘स्व. अशोकराव दुधाणे चौक’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला. आता अशोकरावांचा तो हसतमुख चेहरा रोज दिसणार नसला, तरी या चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कार्याची आणि खंबीर नेतृत्वाची सतत आठवण होत राहील.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालत राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीणशेठ भिलारे, महादेव दुधाणे, महादेव ओंबळे, शंकरराव कळंबे, रमेश चोरमले, अंकुश मालुसरे आबा,व तुकाराम मालुसरे, गॅब्रीएल फर्नांडिस, अजित कळंबे, लक्ष्मण बावळेकर, अभय डोईफोडे, चंद्रशेखर बावळेकर, महेंद्र पांगारे, संतोष गोळे, जानू पांगारे, संतोष आंब्राळे, सुनील मालुसरे, सुहास भिलारे , दत्तात्रय भिलारे दिलीप आंब्राळे, सुनील पार्टे , विठ्ठल दुधाणे, सुरेश दुधाणे गुरुजी तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित विविध वक्त्यांनी अशोकरावांच्या आठवणींना उजाळा दिला. “अशोकराव म्हणजे धाडसाचा पर्याय होते. एखादी गोष्ट पटली नाही तर नेत्यांनाही थेट सुनावण्याचा दम त्यांच्यात होता. पण त्या जरबेमागे एक हळवं मन होतं. कोणाला रागावले तरी काही वेळाने स्वतःहून फोन करून विचारपूस करणारा तो माणुसकीचा झरा होता,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
त्यांचा स्पष्टवक्तेपणा, तडकाफडकी निर्णय घेण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची वृत्ती यामुळेच आज संपूर्ण गाव आणि पंचक्रोशी शोकसागरात बुडाली आहे. खिंगरच्या मातीतल्या या लोकनेत्याचा नामकरण सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, तो एक भावनिक मेळावा ठरला.
चौकट
नेत्याला मोठं पाहण्याचं अशोकरावांचं स्वप्न आपण पूर्ण करूया; कार्यकर्त्यांचा खिंगरमध्ये वज्रनिर्धार
यावेळी केवळ आठवणीच सांगितल्या गेल्या नाहीत, तर एका नव्या संकल्पाचा पायाही रचला गेला. अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात एक अत्यंत भावूक आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. वक्त्यांनी सांगितले की, “अशोकरावांची एकच प्रबळ इच्छा होती, ती म्हणजे आपले नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांना यशाच्या शिखरावर पाहणे. अशोकराव आज आपल्यात नसले, तरी त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. राजेंद्रशेठ यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे करणे, हीच आपल्या लाडक्या कार्यकर्त्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.”
हा विचार मांडला जाताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली. आपल्या नेत्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहण्याचा आणि अशोकरावांच्या शब्दाला जागत राजेंद्रशेठ राजपुरे यांना ताकद देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी बोलून दाखवला. ज्या नेत्याने आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला, त्या अशोकरावांच्या इच्छापूर्तीसाठी आता संपूर्ण पंचक्रोशी एकवटल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.
अशोकरावांच्या जाण्याने झालेली जखम कधीही न भरून निघणारी असली, तरी त्यांच्या विचारांचा वारसा आणि नेत्याप्रती असलेली त्यांची निष्ठा यापुढेही खिंगरच्या मातीत कायम धगधगत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
























