पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पर्यटननगरी पाचगणी येथील फायनल प्लॉट क्रमांक ४६३ मध्ये झालेल्या अनधिकृत वृक्षतोडीचे प्रकरण आता अधिक गंभीर झाले असून, या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी वाईचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. योगेश खरमाटे यांनी एका विशेष उपसमितीची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये महसूल, नगररचना, भूमी अभिलेख आणि वनविभागाच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणीतील संबंधित भूखंडावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना झाडे तोडण्यात आल्याची तक्रार जावळी तालुक्यातील रुईघर येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश रांजणे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या आढावा बैठकीत या बेकायदा वृक्षतोडीबाबत सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता पाचगणीच्या मुख्याधिकाऱ्यांसह महाबळेश्वरचे तहसीलदार, सातारा नगररचनेचे सहाय्यक संचालक, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक आणि वनक्षेत्रपाल यांची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे.
या उपसमितीला संबंधित जागेचा पंचनामा करून, नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, तक्रारदाराने केवळ वृक्षतोडच नव्हे, तर या प्रक्रियेत सामील असलेल्या शासकीय यंत्रणेतील त्रुटींवरही बोट ठेवले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या तक्रारीतील मूळ विषय अद्याप कार्यवाहीत (Pending) ठेवला असून, समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. या निर्णयामुळे पाचगणीतील भूमाफिया आणि अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत होत आहे.
























