पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: निसर्गरम्य पाचगणी शहरात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने ‘रोटरी मॅरेथॉन’चे अत्यंत भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘रन टू फाइट कॅन्सर’ या मुख्य उद्देशाने प्रेरित होऊन ही स्पर्धा आयोजित केली असून, यातून मिळणारा निधी हा ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार आणि आधार मिळावा या हेतूने रोटरीने हे पाऊल उचलले असून, या सामाजिक उपक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष अमित बोधे व सेक्रेटरी आदित्य गोळे यांनी दिली आहे.
पाचगणी रोटरी क्लब नेहमीच अशा विविध संकल्पना राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असते. यंदाची मॅरेथॉन ही केवळ एक शारीरिक स्पर्धा नसून ती कॅन्सरग्रस्तांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारी एक चळवळ आहे. आपली एक धाव एखाद्या रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी मोलाची ठरू शकते, अशी भावनिक साद रोटरीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी नागरिकांना घातली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण पाचगणी शहर एका चांगल्या कार्यासाठी रस्त्यावर उतरणार असून, यातून माणुसकीचे एक वेगळे उदाहरण प्रस्थापित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या स्पर्धेमध्ये नाव नोंदवण्यासाठी तसेच मॅरेथॉनच्या नियोजनाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी अध्यक्ष अमित बोधे, सेक्रेटरी आदित्य गोळे, भूषण बोधे तसेच रोटरी क्लबच्या इतर सर्व सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या ‘कॅन्सरमुक्त समाज’ अभियानात सहभागी होऊन ही रोटरी मॅरेथॉन यशस्वी करावी, अशी विनंती क्लबच्या वतीने करण्यात आली आहे.
























