वपाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : बालदिनानिमित्त एम.आर. भिलारे विद्यालयात निसर्गरम्य वातावरणात खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन
कै. एम. आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी येथे फेबर-कॅसल कंपनीच्या सहकार्याने खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. निसर्गाच्या सान्निध्यात भरलेल्या या स्पर्धेला फेबर-कॅसलने देशातील पहिली खुल्या हवेत आयोजित शैक्षणिक स्पर्धा म्हणून मान्यता दिली. फेबर-कॅसल साऊथ आशिया, आफ्रिका आणि मिडल ईस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पार्थो चक्रवर्ती यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यात श्री. शेखर मुंडले, चेअरमन, सन्टोरी इंडिया प्रा. लि.; पुणे येथे बाल लैंगिक शोषणाविरोधात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सौ. शमा खेर; बालकल्याणासाठी कार्यरत कॅप्टन कार्ल डिसूजा; तसेच देवराई आर्ट व्हिलेजचे चंद्रकांत सर आणि नीरज सर (परीक्षक) यांचा समावेश होता. संस्थेच्या संचालिका आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तेजस्विनी भिलारे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरव प्रदान केला.
बालदिनानिमित्त शाळेत आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. इयत्ता आठवीतील गटात मुग्धा पोळ प्रथम, केदार जाधव द्वितीय आणि संस्कृती रांजणे तृतीय ठरले. इयत्ता नववीत श्वेता जाधव प्रथम, शंतनू कुंभार द्वितीय आणि देविका पवार तृतीय स्थानावर राहिल्या. इयत्ता दहावीमध्ये आयुष राजपुरे यांनी प्रथम, प्रथमेश सतीश वाघमोडे यांनी द्वितीय आणि कार्तिक राजपुरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जितेंद्र शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अजित राजपुरे यांनी मानले. सूत्रसंचालन संजय लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राकेश नेवसे, सौ. विद्या ननावरे, श्री. गणेश आखाडे आणि सौ. कौसल्या राजपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
























