पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व स्पर्धा परीक्षांना सक्षम करण्याचे व्यासपीठ आहे. काळ बदलत आहे, पालकांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शिक्षणातून आपल्या पाल्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले.
राजपुरी (तालुका महाबळेश्वर ) येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेचा शैक्षणिक पालक व माजी विद्यार्थी मेळावा व प्रज्ञाशोध परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांचा बक्षिस वितरण समारंभ श्री विठ्ठल मंदीर राजपुरी येथे संपन्न झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्री राजेंद्रंशेठ राजपुरे बोलत होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी , राजपुरी व आंब्रळ गावातील पालक, शिक्षणप्रेमी नागरिक,माजी विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते मंदिरातील श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील देवी- देवतांच्या पूजनाने करण्यात आली.
मेळाव्यात आदर्श शाळेच्या भौतिक सोयी – सुविधा त्यांची पूर्तता , लोकसहभाग यावर सविस्तर चर्चा करून शाळा कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
राजेंद्रशेठ राजपुरे यांनी आदर्श शाळेच्या शासन अनुदानातून व लोकसहभागातून झालेल्या व यापुढील नियोजित कामांची रुपरेषा सांगून. गावातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेतून गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षकांच्या मदतीसाठी सहाय्यक शिक्षक नेमणूका करत असल्याचे सांगितले.
शाळेत निबंध, वक्तृत्व, पाढे पाठांतर, स्टोरी टेलींग, श्लोक व स्तोत्र पाठांतर यांसारख्या स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक सुसंस्कार रुजवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा चांगले काम करत आहेत. या शाळांचा पट टिकविणे व वाढविणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्येची निर्माण झालेली अडचण चिंतेची बाब आहे.आपल्या शाळा आदर्श व्हाव्यात असे वाटत असेल तर शाळा व्यवस्थापन समिती व गावाने यासाठी पुढाकार घेऊन योगदान दिले पाहिजे. शाळेने राजपुरी टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा नवा पॅटर्न तयार करून एक नवीन प्रोत्साहन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. ग्रामपंचायत अधिकारी वैभव काळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात सर्व घटकांना समान न्याय देत गावाच्या विकासकामांसाठी वेळ दिला याबद्दल त्यांची स्तुती करत त्यांच्या जागेवर रुजू झालेले अमोल धुमाळ हेही राज्य पुरस्कार विजेते असून चांगले काम करणारे आहेत असे सांगितले. आपल्या गावाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी चांगले लाभले आहेत हे लोकांचे भाग्य आहे या शब्दात त्यांनी सर्वांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी वैभव काळे यांना गावाच्या वतीने मा. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन निरोपाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खिंगर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संजय पारठे यांनी शतक महोत्सवी वर्षात शाळा राबवित असलेल्या विविध उपक्रम व स्पर्धा यांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका, जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षा व राजपुरी टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ या शाळा स्तरावरील ३०० गुणांच्या मूल्यांकनात इयत्ता १ली ते ८ वी मध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विजेत्यांना पारितोषिके देणयात आली.
कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ. शितल राजपुरे, उपसरपंच शंकर राजपुरे, कार्यकर्ते अशोक राजपुरे, भिमसेन राजपुरे, श्रीकांत राजपुरे , बाळासाहेब घाडगे,शाळेचे अध्यक्ष संदीप राजपुरे, सचिन राजपुरे, विशाल राजपुरे, अश्विनी राजपुरे,वर्षा राजपुरे, आनंदा राजपुरे, विश्वास राजपुरे, साहेबराव राजपुरे,वैभव काळे, अमोल धुमाळ, संदीप मामीलवाड, नारायण आंब्राळे, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सदस्य,पालक,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ ,अंगणवाडी स्टाफ व शिक्षक उपस्थित होते.
मुख्याध्यापक अरविंद चोरट यांनी सर्वांचे स्वागत, प्रस्ताविक केले, अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक व स्पर्धांचे महत्त्व सांगितले , सौ.योगिता पोळ यांनी सूत्रसंचालन व आभार, सौ.निलोफर शेख व सुनिता खाडे यांनी यादी वाचन केले.
























