पांचगणी न्यूज नेटवर्क
तळदेव : मागील सहा महिन्यापासून उत्तेश्वर येथील बीएसएनएल टॉवरची रेंज सातत्याने जात असल्याने कांदाटी विभागातील लोक अक्षरशः वैतागून गेले आहेत. रेंजचा प्रोब्लेम निर्माण झाल्याने एकमेकांचा संपर्क तुटल्याने अनेक समस्यांना या विभागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
कांदाटी भागातील कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीचे कार्यकर्ते सातत्याने अधीकारी यांच्याशी संपर्क साधत असल्याने येथील नेटवर्क काही काळ चालू असते. मोबाईल मधील रिचार्ज व्यर्थ जात असल्याने स्थानिक संतापले आहेत. सध्या अवकाळी पाऊस चालू असल्याने या विभागात गेल्या ८ दिवसापासून संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये मयत झाले असून देखील त्याची माहिती अद्याप मुंबई – पुणेकर यांना मिळालेली नाही. या प्रकाराला संतापलेल्या ग्रामस्थांनी या विभागात कायमस्वरूपी टिकणारे नेटवर्क मिळावे अशी मागणी केली आहे.
बीएसएनएल कंपनीने महाबळेश्वर येथील कनेक्शन उत्तेश्वरला जोडावे व या ठिकाणीं सोलर पॅनलची व्यवस्था करून द्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर काही कारणास्तव वारंवार वीज खंडित होत असल्याने सोलर पॅनल उपयुक्त ठरेल. तसेच कांदाटी विभागातील लोकांकडे साधे फोन असल्याने 2 G नेटवर्क चालु होते ते काही दिवस बंद आहे. व 4G नेटवर्क अँड्रॉईड मोबाईल मध्ये चालत आहे. या विभागातील लोकांना अँड्रॉइड फोन वापरता येत नसल्याने 4G नेटवर्क व 2G,3G सर्व प्रकारच्या नेटवर्कची तरतूद या विभागात करून द्यावी.
वरील बाबींची बीएसएनएल कंपनीने दक्षता घेतली नाही तर महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील जनता आमरण उपोषण करेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
























