पाचगणी न्यूज नेटवर्क
करहर (ता. जावली) : “जावलीच्या राजकारणात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अत्यंत खेदजनक आहे. माझी लढाई ही विठ्ठलाशी नाही, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या बडव्यांशी आणि कंत्राटदारांशी आहे. जेव्हा चांगल्या नेत्याच्या भोवती स्वार्थी बडवे उभे राहतात, तेव्हा त्या नेत्याची किंमत कमी करण्याचे काम हे लोकच करतात. ही लढाई कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नसून, ती जावलीच्या स्वाभिमानाची आणि विचारांची आहे,” असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. म्हस्वे गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप पवार, विठ्ठल गोळे आणि शिल्पा शिंदे यांच्या सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बुवासाहेब पिसाळ, योगेश गोळे, मिलिंद शिंदे यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, नेत्याला घेरून ठेवणाऱ्या कंत्राटदारी संस्कृतीमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत. याच भूमिकेला साथ देताना गणाचे उमेदवार विठ्ठल गोळे यांनी विरोधकांच्या ‘मुंबईकर’ या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. “विठ्ठलाच्या साक्षीने मी आजपासून या मातीच्या सेवेसाठी रुजू झालो आहे. जे लोक आम्हाला मुंबईकर म्हणतात, त्यांनी आधी हे सांगावे की तुम्ही कोणत्या चिन्हावर निवडून आलात आणि आज कोणत्या चिन्हावर मते मागत आहात? जर आमच्या गावात सत्ताधाऱ्यांनी केवळ १ लाखाचा विकासनिधी दिला असेल, तर मी आजच निवडणुकीतून माघार घेतो,” असे खुले आव्हान त्यांनी दिले. गावागावात विकास नेमका कुठे झाला, याचे उत्तर देण्याची वेळ आता आली असून जनताच मतपेटीतून याचा फैसला करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद उमेदवार संदीप पवार यांनीही यावेळी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांच्या दाव्यांची पोलखोल केली. “तालुक्यात ४०० कोटींच्या रस्त्यांची कामे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाली आहेत, तुम्ही स्वतः काय केले ते सांगा? धरणाची कामे जाणीवपूर्वक बंद पाडायची आणि स्वतःचे इप्सित साध्य करायचे, हे तुमचे राजकारण आता चालणार नाही. विरोधात जाणाऱ्यांच्या बदल्या करणे आणि त्यांना त्रास देणे ही तुमची पद्धत जावलीची जनता ओळखते,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. या सभेमुळे करहर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शशिकांत शिंदेंनी ‘बडव्यां’वर केलेला हा हल्ला सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
























