‘निवडणुकीपुरते नारळ फोडणाऱ्यांपासून सावध राहा’; केळगणे, भिलारे आणि चोरमले यांच्या प्रचाराचा झंझावात
पाचगणी /पाचगणी न्यूज नेटवर्क : महाबळेश्वर तालुक्याचे राजकीय हृदय मानल्या जाणाऱ्या भिलार गट आणि गणात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ‘विजयी मुसंडी’ कायम राखली असून विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली भिलारच्या मातीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच दरारा पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद उमेदवार संजय केळगणे, भिलार गणाच्या उमेदवार वंदना भिलारे आणि मेट–गुताड गणाच्या उमेदवार शकुंतला चोरमले या तिन्ही ‘लोकाभिमुख’ उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून बालेकिल्ल्यात गुलालाची तयारी पूर्ण झाली आहे.
प्रचारादरम्यान बोलताना राजेंद्रशेठ राजपुरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, “ज्यांना पक्षाची बांधिलकी नाही आणि ज्यांची स्वतःची वळचण नाही, त्यांनी आमच्या विकासकामांवर बोलू नये. सोयीनुसार पक्ष बदलून केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आरोप करणाऱ्यांची ग्रामीण भागातील जनता किंमत ओळखून आहे. ज्यांना गावागावातील वाड्या-वस्त्यांचा पत्ता नाही, त्यांनी पहिल्यांदा ग्रामीण भागात स्वतः विकास करावा आणि मग आमच्यावर बोलावे. निवडणुकीचे वारे आले की मतांच्या झोळीसाठी नारळ फोडणारे हे ‘हंगामी’ नेते आहेत, यांच्यापासून जनतेने सावध राहावे.”
स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांनी निर्माण केलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व आज राजेंद्रशेठ राजपुरे आणि प्रवीण भिलारे यांच्या सक्षम नेतृत्वात अधिक घट्ट झाले आहे. “आम्ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मैदानात आहोत. आमचे उमेदवार हे सामान्य जनतेच्या सुख-दु:खात २४ तास उपलब्ध असणारे कार्यकर्ते आहेत,” असा विश्वास यावेळी प्रवीण भिलारे यांनी व्यक्त केला. विरोधक पूर्णपणे बॅकफूटवर गेले असून त्यांच्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा उरला नसल्याचे चित्र गावोगावी दिसत आहे.
भिलार गट आणि गणातील वाड्या-वस्त्यांवर राष्ट्रवादीच्या प्रचाराचा जोर असा आहे की, विरोधकांचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले आहे. कार्यकर्त्यांची अभेद्य फळी, विकासकामांचा ठोस लेखाजोखा आणि मकरंद पाटील यांच्यावरील जनविश्वास यामुळे केळगणे, भिलारे आणि चोरमले यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरली आहे. “विकासाच्या आड येणाऱ्यांना आणि केवळ संधीसाधू राजकारण करणाऱ्यांना जनता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल,” असा ठाम निर्धार मतदारांनीही व्यक्त केला आहे.
एकूणच, भिलारच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘वज्रमूठ’ कायम असून, विजयाचा गुलाल अंगावर घेण्याकरिता कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे.
























