पांचगणी न्यूज नेटवर्क
भोसे : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर जिल्हास्तरावर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोसे येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी ईश्वरी सागर गोळे हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून शाळेसह संपूर्ण गावाचा मान उंचावला आहे. तिच्या या यशाने महाबळेश्वरच्या शैक्षणिक वर्तुळात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत ईश्वरीने आपल्या प्रगल्भ विचारांची मांडणी, विषयाचे सखोल ज्ञान आणि ओघवती लेखनशैली यांच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. तिने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता सिद्ध करणारे ठरले आहे.
कराड येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात ईश्वरीचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि योजना शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईश्वरीच्या लेखनगुणांचे विशेष कौतुक करत तिला पुढील उज्ज्वलभविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ईश्वरीला मिळालेल्या या यशामागे तिची जिद्द, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे खंबीर पाठबळ असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये यश मिळवल्यास इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळते, असा विश्वास भोसे शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल भोसे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून तिचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, नितीनदादा भिलारे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे,पंचायत समिती सदस्य वंदनाताई भिलारे, शकुंतला चोरमले, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, गटशिक्षणाधिकारी, सुरेंद्र भिलारे, भोसे सरपंच अरुण गोळे, राम गोळे तसेच भोसे ग्रामस्थ, युवक व महिला मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























