पाचगणी न्यूज नेटवर्क
वाई : सातारा जिल्ह्यात पाणीदार गाव अशी ओळख निर्माण करणारे, तसेच शाश्वत विकास आराखड्यावर धोरणात्मक कार्य करणारे वाई तालुक्यातील वेळे गाव लोकसहभागातून गावाचा कायापालट करता येतो याचा प्रत्यय या गावाने घेतला आहे. गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी वेळे ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार दि. २३ जुलै रोजी प्रेरणादायी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात गावातील महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एकात्मतेने शाश्वत विकासाचा दृढ संकल्प करून सर्वांगीण विकास करणारे वेळे गाव अशी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
दुष्काळाच्या झळा सोसून आठ दिवसाला गावाला पाणीपुरवठा करताना स्वतःचे पाणी स्वतः निर्माण करण्यासाठी अबाल वृद्ध, महिला, पुरुषांनी गत वर्षी कंबर कसली सातत्याने ६५ दिवस श्रमदान करून १४ किलोमीटर खोल सी सी टी तसेच ४० मातीबांध निर्माण केले. लोकसहभागातून केलेल्या कामामुळे यावर्षी गावाला पाणीटंचाई जाणवली नाही या सामाजिक उपक्रमास नाम फाउंडेशन, परांजपे ऑटो कास्ट प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ यांचे पोकलेन मशीनसाठी अर्थ सहाय्य केले तसेच ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांनी पोकलेन मशीनचे डिझेल करिता लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन मोलाचे योगदान केले आहे.
शाश्वत विकास आराखड्यावर मार्गदर्शन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी संस्था पुणे पंचायतराज प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि महिला बचत गटाला लाभले, महिलांनी ग्रामपंचायत विकासात आपला सहभाग वाढवावा तसेच योगदान द्यावे याकरिता महिलांनी ग्रामसभेसाठी उपस्थित राहून आपले प्रश्न विचारावेत तसेच आपल्या हक्कांबद्दल जागृती करून घ्यावी असे प्रतिपादन विद्याधर गायकवाड यांनी केले,
वेळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन गाव विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत त्यांची काम करण्याची चिकाटी व प्रयत्न बघता सदैव आघाडीवर राहणारे गाव असे वेळे गावाकडे पहावी लागेल अशा प्रयत्न करणाऱ्या गावांना आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची मदतीची गरज आहे त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहूया वेळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहूया असे आवाहन नाम फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक असलेल्या ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई चे विद्यमान अध्यक्ष व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व वेळे गावचे सुपुत्र जिजाबा पवार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी गावास मिळत आहे. वेळे गावच्या जलसंधारणास संस्थेने रु 4 लाखाचे भरीव योगदान दिले असुन संस्था महाराष्ट्रात व्यवसायात व सामाजिक योगदान देण्यातही अग्रेसर आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामध्ये बाधितांना मदत, अनेक शाळेसाठी मदत, गुळुंब चांदक ओडा जोड प्रकल्पास अर्थिक मदत, तसेच जलसंधारण कामात कवठे, केंजळ या गावांना प्रत्येकी ४ लाखाची मदत करणारी संस्था आहे. तसेच इतर अनेक सामाजिक कार्यास नेहमीच मदत करणारी आपली ज्ञानदीप पतसंस्था आहे, असे मत अध्यक्ष जिजाबा पवार यांनी मांडले.
या स्नेहमेळाव्यात वेळे गावचे प्रथम नागरिक सौ.अर्चना गायकवाड, उपसरपंच श्री. राहुल ननावरे, ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक एकनाथ जगताप, रविंद्र केंजळे, बाळासाहेब वांजळे, निवृत्ती म्हस्के, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, गणेश गायकवाड, यशोधन ट्रस्ट अध्यक्ष रवी बोडके, श्री. लक्ष्मण डेरे, माजी सरपंच श्री. विश्वास पवार, मुंबई सहकारी बोर्ड संचालक हंबीरराव पवार, सामाजीक कार्यकर्ते अनिल पवार, बी. के. पवार, सुरेश पवार, ग्रामविकास अधिकारी श्रुतिका जाधव, ग्रामपंचायत कार्यकारिणी दरशरथ पवार, दिपक पवार, विजय पवार, निलम नलावडे, माजी उपसरपंच उषा पवार, गोविंद पवार, महादेव भिलारे, सतीश उमाळ, सिताराम जाधव, मंगल मोरे, शालन पवार, बजरंग पवार, स्वप्नील कांगडे, स्वप्नील जाधव, अक्षय भिलारे, गणपत भिलारे, दिपक सोनवणे, भानुदास पवार, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भिलारवाडी येथील श्री.लक्ष्मण भिलारे यांचे उपचारासाठी लोकसहभाग वर्गणीतून रुपये ३० हजारांची मदत कार्यक्रमस्थळी देण्यात आली.
























